Kedar Dighe On Anand Dighe Death.
आनंद दिघे यांच्या मृत्यूवरुन शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खासदार संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की आनंद दिघेंना मारलं गेलं आणि त्यांचा मृत्यू हार्ट अटॅक म्हणून दाखवला गेला. या दाव्यानंतर दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी शिरसाट यांना 23 वर्षांनंतर अचानक असे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, यावर विचारणा केली आहे. त्यांनी शिरसाट यांना पुरावे देण्याचे आव्हान देखील दिले आहे.आनंद दिघे यांच्या मृत्यूचा मुद्दा हा शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटामधील वादाचा एक नवीन टप्पा ठरत आहे.
संजय शिरसाट यांनी नुकताच दावा केला की आनंद दिघेंना मारलं गेलं, आणि हा दावा करताच राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद अधिक उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर, नुकताच प्रदर्शित झालेला धर्मवीर टू हा चित्रपट या चर्चेत अजून भर घालतोय, कारण 2022 मध्ये आलेल्या धर्मवीर चित्रपटानंतरही असेच आरोप-प्रत्यारोप झाले होते.
महत्त्वाचं म्हणजे, २ मे २०२२ रोजी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केलं होतं. तेव्हा शिंदे यांनी सांगितलं होतं की, आनंद दिघेंना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी म्हटले होते की दिघेंचा अपघात झाला होता, ज्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, पण डॉक्टरांनी जे निदान केलं त्यानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळेच झाला होता.
या विधानानंतर आता शिरसाटांच्या नवीन दाव्यामुळे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे.
‘दिघेंची ओळख घट्ट करण्यासाठी पार्ट टू’.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पार्ट २ चित्रपटाबद्दल बोलताना आनंद दिघे यांच्या कार्याचे आणि विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की धर्मवीर या चित्रपटाच्या पहिल्या भागात दिघे साहेबांच्या कार्याचा एक भाग मांडला गेला होता, परंतु त्यांच्या व्यापक कार्यपद्धतीला एका चित्रपटात साचेबद्ध करणे शक्य नाही. यामुळेच दुसरा भाग म्हणजे धर्मवीर पार्ट २ तयार केला आहे, ज्यातून आनंद दिघे यांची कार्यपद्धती आणि विचारसरणी आणखी स्पष्टपणे लोकांसमोर येईल.
शिंदे यांनी या चित्रपटाचे हिंदीत देखील रुपांतर होणार असल्याचे जाहीर केले आहे, ज्यामुळे आनंद दिघे यांचे विचार आणि कार्य अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. त्यांनी धर्मवीर पार्ट २ साठी शुभेच्छा देत चित्रपटाच्या यशाबद्दल आशावाद व्यक्त केला.
दिंघेंच्या मृत्यूवरुन शंका.
आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत आरोप आणि शंका याआधीही उपस्थित झाल्या आहेत. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनीदेखील यापूर्वी असा दावा केला होता की दिघे यांच्या मृत्यूबाबत सत्य सांगावं लागेल. परंतु, स्वतः नारायण राणेंनी त्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की दिघे यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नव्हता. ते म्हणाले होते की, निलेश राणेंना योग्य माहिती मी स्वतः देईन, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांच्या अपघातानंतरच्या घटनांचा चित्रण केले आहे. अपघातानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, त्यांची प्रकृती बिघडली असताना राज ठाकरे त्यांना भेटायला आले होते. राज ठाकरे निघून गेल्यावर नारायण राणे हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. या दरम्यान, दिघे खिडकीतून जमलेल्या समर्थकांना हात दाखवतात, मात्र काही वेळातच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांचा मृत्यू होतो. मृत्यूची बातमी पसरल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतात, आणि या बातमीमुळे आक्रोश झालेल्या समर्थकांनी रुग्णालयाला आग लावली होती.
सिनेमातील सीनवरुन टीका.
आता धर्मवीर टू सिनेमातील एका सीनवरुनही टीका सुरु झालीय. फॅक्टमध्येच चूक केल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. ज्यात एकनाथ शिंदे दिघेंना विचारतात की राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला. शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला. राज ठाकरेंसारखा झंझावात घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येवून आदळलंय. त्यावर दिघे म्हणतात की, काय चाललंय तुझ्या मनात, तुला नक्की काय करायचंय. आता या सीनवरुन संजय राऊतांनी सिनेमा काल्पनिक आणि बोगस असल्याची टीका केली आहे.
राऊत यांची सिनेमावर टीका.
धर्मवीर चित्रपटातील काही दृश्यांवरून सध्या राजकीय वाद रंगले आहेत. चित्रपटात दाखवलेल्या एका प्रसंगात, एकनाथ शिंदे राज ठाकरेंना डावलल्याबद्दल आवाज का उठवला नाही, असा सवाल आनंद दिघे यांना करतात. मात्र, या प्रसंगाबाबत संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आनंद दिघेंचं निधन 2001 मध्ये झालं, आणि उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी 2003 मध्ये बसवण्यात आलं, तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली 2005 मध्ये. त्यामुळे, दिघेंच्या हयातीत हे घडलंच नाही, ते सिनेमात दाखवण्यात आलं असल्याची टीका राऊतांनी केली आहे.
दुसरीकडे, या दृश्यावर प्रतिक्रिया देताना चित्रपटाचे पटकथा लेखक प्रवीण तरडे यांनी असं म्हटलं आहे की, लोकांनी चित्रपट पाहावा आणि मगच त्या दृश्याबद्दल मत व्यक्त करावं. ते या दृश्याचं समर्थन करत आहेत आणि सिनेमा हा कलाकारांच्या दृष्टिकोनातून मांडलेला एक प्रकार असतो, हे पटवून देत आहेत.
जरी चित्रपटातील दृश्यांचा मुद्दा चर्चेत असला तरी, संजय शिरसाटांनी नुकताच केलेला दावा की आनंद दिघेंचा मृत्यू घातपाताचा परिणाम होता, यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.
हेही वाचा : ज्या शिवरायांनी अभेद्य किल्ले बांधले त्यांचाच पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला, शिवप्रेमींमध्ये संताप.
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट योग्य वेळीहव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.